येत्या 26 डिसेंबरला रायगड प्रदक्षिणा आहे. महाराजांबद्दल प्रेम असणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी ही प्रदक्षणा करावी.
पाच वर्षांपूर्वी ही प्रदक्षिणा मी केली होती. अगदी थोडक्यात या प्रदक्षिणेचं वर्णन त्यावेळी केलं होतं. साधारण कशा प्रकारची ही प्रदक्षिणा असते याचा अंदाज येण्यासाठी आणि वाचकांनी प्रदक्षिणा करण्यासाठी उद्युक्त व्हावं यासाठी माझा छोटासा अनुभव देत आहे.
....................................................
आपण प्रदक्षिणा कोणाला घालतो?
आपली ज्याच्यावर श्रद्धा आहे, भक्ती आहे, अतूट विश्वास आहे आणि प्रेम आहे. आपल्या सारख्या वारक-याचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि आपलं पंढरपूर म्हणजे रायगड. अशा या रायगडाला २५ डिसेंबर या दिवशी प्रदक्षिणा आहे हे कळल्यापासून मनाने हट्टच धरला की " काही झालं तरी हे तुला करायचंय प्राची." मग काय.. सर्व पूर्वतयारी केली आणि मी आणि माझ्या मुली निघालो आणि २४ डिसेंबरला संध्याकाळी पाचाडला पोहचलो.
जिजाऊसाहेबांची समाधी असलेलं पाचाड गांव. विचारानेच मन भरुन आलं एकदम.
२५ तारखेला सकाळी ७ वाजता पाचाड येथून टिम लिडर श्रद्धा मकरंद जोशी आणि केदार मोहिदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात केली. आमच्या बरोबर आमची मुलंही होती. त्यांचा उत्साह पाहून एखाद्या मोहिमेवर निघालेले छोटे शिलेदारच वाटत होते ते....प्रदक्षिणेला सुरुवात करुन थोडी चढण चढल्यावर सुरुवातीच्या १० मिनिटात असं वाटलं की माझा निर्णय चुकला तर नाही ना? छाती फुटुन हृदय बाहेर येतं की काय असा दम लागलेला.
पाठीवर ३ किलोचं वजन आणि बरोबर नवमी (१२) आणि स्विहा (८) या मुलींची जबाबदारी. हाय रे देवा.. कुठल्याही परिस्थितीत माघारी जायचं नाही हा निश्चय... कारण माझ्या दैवताला घालायची माझ्या मनानेच निवडलेली प्रदक्षिणा होती ती.... सर्व विचार बाजूला सारुन सगळं बळ एकवटलं आणि मार्गक्रमण सुरु केलं....
दोन्ही मुली मस्त मजेत टणाटण उड्या मारत जात होत्या. खूप thrilling n exciting होतं सगळंच. चिंचोळा दगडगोट्यांचा आणि न संपणारा रस्ता, झाडं-वेली यांनी भरलेला, सोबत महाराजांवर प्रेम असणारी माणसं...
जाम मज्जा येत होती. टूर लिडर्स सगळ्यांना प्रोत्साहन देत होतेच.
थोडं पुढे आल्यावर टकमक टोकाचा सुळका दिसला. इथूनच स्वराज्याच्या फितूरांना आणि गद्दारांना ढकलून दिलं जात असे. पाहूनच धडकी भरली. अत्ताच्या काळात सुद्धा अशी शिक्षा असती तर???? असो...
पुढे आल्यावर लिंगाणा किल्याचं दर्शन झालं. दाट जंगल आणि समोर डोंगर रांगा... आहाहा! तिथेच शांत बसावं, काहीच बोलू नये. फक्त ते दृश्य अनुभवावंस वाटलं. थांबलोच थोडावेळ. कोणी काही बोलत नव्हतं अगदी मुलं सुद्धा. पण वेळेचं भान ठेवणं आवश्यक होतं. निघावंच लागलं.
अखेर ती प्रसिद्ध वाघोली खिंड आलीच. खूप काही ऐकलं होतं या खिंडीबद्दल. दोन पावलं मावतील असा सरळ चढतीचा रस्ता. पहिलं पाऊल पक्कं बसल्यावरच दुसरं टाकू शकत होतो नाहितर कपाळमोक्षच. मिळतील त्या मुळांचा, पानांचा, वेलींचा आधार घेत बोटं मातीत रुतवत रांगत रांगत एकदाची खिंड पार केली. आता अजून एक परीक्षा होती. ती म्हणजे खिंड उतरायची. सगळ्यात जास्त thrilling होतं ते... लोकांच्या सोईसाठी काही ठिकाणी रोप बांधले होते. रोपला धरुन उतरणं म्हणजे दिव्यच होतं. रोप धरुन हात पुरते लाल लाल झालेले. उतरताना वरून येणा-या लोकांच्या पायानी खाली येणारे दगड चुकवायचे की आपलं पाऊल नीट वाटेवरच पडतंय ना हे बघायचं? वरुन आलेला मोठा दगड माझ्या पुतण्याने आशूने स्वत:च्या पायाने अडवला. जर त्याने अडवला नसता तर माझा एखादा अवयव जायबंदीच झाला असता.
खिंड संपली आणि खूप सुंदर वेलींनी बनलेल्या कमानीने आमचं स्वागत केलं... आहाहा!!!! त्या कमानी खालून कमरेत आणि गुडघ्यावर वाकून चालणं म्हणजे विचारुच नका. वाटेत खूप वेळा रांगत, पायावर बसत प्रवास होता. अवर्णनीय!!!! ते सौंदर्य डोळ्यात साठवण्याच्या नादात फोटो काढायचे भानही राहिले नाही.
गंमत म्हणजे या सगळ्या प्रवासात माझ्या मुलींनी एकदाही माझी मदत घेतली नाही. प्रदक्षिणा पूर्ण करायला आम्हाला सहा तास लागले. अंदाजे १५ - १६ किमी चाललो आम्ही.
खूप चांगली माणसं आणि उत्तम अनुभव मिळाला.
युथ क्लबच्या सर्व मेंबर्सनी या प्रदक्षिणेसाठी खूपच कष्ट घेतले. दोन दिवस आधी जाऊन संपूर्ण रुट मार्कींग करणं आणि चालण्याइतपत रस्ता मोकळा करणं हे अवघड काम त्यांनी आनंदाने केलं. ६५० लोकांचं नाश्ता, जेवणापासूनचं व्यवस्थापन बघणं सोपी गोष्ट नाही.
महाड यूथ क्लबचे मनापासून आभार. त्यांच्यामुळे मी ही प्रदक्षिणा करू शकले.
- प्राची चितळे जोशी.
..................................................
अश्या या प्रदक्षिणेला सर्वांनी नक्की जा