
सूचना / Notice
ऑनलाईन नोंदणी करण्याची वेळ संपली आहे. ऑफलाईन नोंदणी 29 डिसेंबर रोजी सकाळी पाचाड येथे होईल. The time for online registration is over. Offline registration will be done on 29th December morning at Pachad.
छत्रपती श्री शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली रायगड ही एक पूजनीय तसेच ऐतिहासिक वास्तू ! आपण ज्याला पूजनीय मानतो, त्याला प्रदक्षिणा घालणे, ही भारतीय संस्कृती ! या संस्कृतीला अनुसरून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रविवार दि. 29 डिसेंबर 2024 या दिवशी ‘राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आपण सर्वांनी… आबालवृद्धांनी व युवक युवतींनी रायगड प्रदक्षिणा या कार्यक्रमात सहभागी व्हावे.
रायगड प्रदक्षिणा, एक सुखद अनुभव, प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी घ्यावा असा. प्रदक्षिणा थोडीशी खडतर असली तरी मनाचा निग्रह असेल तर सहज करता येते. युथ होस्टेल्स ने जानेवारी १९९३ मध्ये सुरु केलेला रायगड प्रदक्षिणेचा हा प्रपंच ‘युथ क्लब महाड’ ने गेली 32 वर्ष अव्याहत सुरु ठेवला आहे. दरवर्षी प्रदक्षिणार्थींच्या संख्येत वाढच होत आहे. अतिशय नेटकेपणाने आणि शिस्तबद्ध रीतीने ‘युथ क्लब महाड’ ही प्रदक्षिणा आयोजित करीत असते. राज्यातील विविध प्रांतातून लोक प्रदक्षिणेसाठी येतात आणि एक आगळा वेगळा अनुभव गाठीशी घेऊन एक आनंद, एक समाधान मनात साठवून जातात. वास्तविक रायगड हे सर्वांसाठीच एक पवित्र असे स्फूर्तिस्थान आहे. आणि पवित्र वास्तूला प्रदक्षिणा घालणे ही तर आपली परंपराच… आपण नेहमी वर जाऊन रायगड बघतो. पण रायगडच्या आजूबाजूचा परिसर देखील खूप सुंदर आहे, त्याला देखील ऐतिहासिक महत्व आहे. मग रायगड वाडीतील रायनाक स्मारक असो किंवा पोटल्याचा डोंगर असो. रायगड वर राजधानी का केली, तसेच तो अभेद का आहे, हे आपल्याला प्रदक्षिणा केल्यावरच कळते. प्रदक्षिणेच्या मार्गात विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात, पक्ष्यांचे दर्शन होते. पक्षी मित्र किंवा निसर्गमित्र तसेच वनस्पती तज्ज्ञ यांच्यासाठी ही एक पर्वणीच…
रायगडला प्रदक्षिणा घालताना वाचलेला संपूर्ण इतिहासच समोर उभा राहतो. माझ्या राजाच्या राजधानीला, एका युगपुरुषाच्या समाधीला आपण प्रदक्षिणा घालतोय ही भावनाच अभिमानास्पद आहे. तसेच गडावरील विविध ठिकाणांची भव्यता डोळे भरून बघता येते. विशेष म्हणजे टकमक टोक. गडाखालून टकमकचे दर्शन घेणे हे अवर्णनीय, ते प्रत्यक्ष अनुभवणे गरजेचे आहे. चित दरवाजा, हिरकणी बुरुज, टकमक, त्यानंतर महाराजांच्या दर्शनासाठी ध्यान लावून बसलेला लिंगाणा, भवानी टोक आणि गुहा, ज्या डोंगरावरून तोफा डागून रायगड जिंकला गेला तो पोटल्याचा डोंगर, वाघदरवाजा आणि खूप काही.. धार्मिक, इतिहासप्रेमी, निसर्गप्रेमी इत्यादी सर्वांसाठी तर रायगड प्रदक्षिणा उपयुक्त आहेच पण हे जरी काही करायचे नसेल तरी आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून एक दिवस वेगळा जगणे हेही स्फुर्तीदायकच , चला तर मग येताय ना…..
ऑनलाईन नोंदणी करण्याची वेळ संपली आहे. ऑफलाईन नोंदणी 29 डिसेंबर रोजी सकाळी पाचाड येथे होईल. The time for online registration is over. Offline registration will be done on 29th December morning at Pachad.