November 20, 2021 - BY Admin

*रायगड प्रदक्षिणा* Poem

*रायगड प्रदक्षिणा*
मनात स्मरूया शिवरायांचे,
धैर्य, नीती अन शुरपणा..
नमन करूनी युगपुरूषाला,
करू रायगड प्रदक्षिणा...
प्रथम दिसे तो चित दरवाजा,
कोट छातीचा करून खडा..
रक्षाया त्या पाठी राहीला,
बुरूज उभा तो खुबलढा...
पुढे चालता, वरती बघता,
भव्य नजारा दिसे गडाचा..
लपून गेले महाद्वार ते,
असा पसारा उंच तटाचा...
रम्य दिसे परी धाक वाटतो,
टकमकचा तो बघुनी कडा..
कडेलोट करूनी पाप्यांचे,
देशद्रोह्या शिकवी धडा....
साधूसम तो निश्चल भासे,
ध्यान लावूनी जणू बसे
रम्य मनोहर पाहतची राहावे,
लिंगाण्याचे रूप असे...
दाट झाडीतुन वाट चालली,
सरळ कधी तर वळणाची..
भल्याभल्याना घाम फुटावा,
खिंड अशी ही वाघोलीची...
खिंड उतरूनी पुढे पसरले,
पीत गालीचे गवताचेे...
डोळे भरूनी दर्शन घ्यावे,
उंच भवानी बुरूजाचे....
गुंजारव तो नाद मधुर अन,
झाडातूनी पक्षी उडती..
साठवून मग मनी नाद तो,
पाऊले हळू पुढे पडती...
पुन्हा एकदा गर्द झाडी अन,
काळकाईची खिंड दिसे...
दगडामधूनी मार्ग जातसे,
लहान परी अवघड भासे...
थकूनी मग थोडे बैसावे,
रूप गडाचे न्याहाळावे...
वाघद्वारातूनी उतरला,
रामराजासी आठवावे...
अजिंक्य गड हा शत्रूने मग,
काबीज केला ज्याच्या योगे..
पोटल्याचे त्या दर्शन होते,
फिरूनी खंत मनी जागे...
मार्ग संपता दर्शन होते,
हिरकणीच्या त्या बुरूजाचे.
प्रतीक जाहले अमर भूवरी,
पुत्रावर-या प्रेमाचे.....
धडे घेऊनी इतिहासातून,
अंगी भिनवू मर्दपणा..
नमन करूनी युगपुरूषाला,
करू रायगड प्रदक्षिणा...
.........मकरंद.....