November 20, 2021 - BY Admin

पुन्हा एकदा रायगड प्रदक्षिणा... By मकरंद


दिवाळी झाली की वेध लागतात ते रायगड प्रदक्षिणेचे. तसाही आम्हा ट्रेकर्सना कुठलाही ट्रेक म्हणजे सणच.. पण रायगड प्रदक्षिणा म्हणजे उत्सव. चोहोबाजूंनी रायगडचे दर्शन म्हणजे नेत्रसुखद सोहळाच. प्रत्येक अंगाने रायगड वेगळा भासतो. अर्थात कुठूनही दर्शन घेतले तरी मंदिर छानच वाटते. तसेच रायगडचे.. रायगड दर्शन म्हणजे प्रसन्नता, पराक्रमी इतिहासाविषयीचा अभिमान, थोर युगपुरुषाची सुखद आठवण, शेकडो शूर वीरांच्या योगदानाचे पुण्यस्मरण... संपूर्ण महाराष्ट्राच्या साक्षीने प्रत्येक वर्षी हा उत्सव साजरा करण्यात येतो. विविध प्रांतातील प्रदक्षिणार्थी या उत्सवात सहभागी होतात. ज्याप्रमाणे एखाद्या देवाच्या उत्सवात पालखी फिरते त्याचप्रमाणे शेकडो भक्त - हो भक्तच, शिवरायांच्या पुण्यस्मृतीची, शिवनामाची जणू पालखी घेऊनच ही प्रदक्षिणा संपन्न करतात.
वीरमाता जिजाऊंच्या पाचाडमधून सुरू होणारी प्रदक्षिणा दुसरी वीरमाता हिरकणी हिच्या क्षेत्रात पूर्णत्वास जाते. प्रदक्षिणा मार्गात सुरुवातीपासूनच पराक्रमाची भव्य शिल्पं दिसू लागतात. पहिल्या टप्प्यातच शत्रूला चित करणारा चितदरवाजा, हिरकणीच्या पराक्रमाची साक्ष असलेला हिरकणी बुरूज, बुलंद अशा महादरवाजाची अभेद्य तटबंदी, फितूरांच्या मनात भय निर्माण करणारा टकमकचा उंच कडा, दमछाक करणारी वाघोली खिंड, माता भवानीची गुहा आणि बुरूज, छत्रपती राजाराम महाराजांना शत्रूच्या तावडीतून मुक्त करणारा वाघदरवाजा, या सर्व वास्तूंच्या दर्शनाबरोबरच या तीर्थक्षेत्राच्या परिसरात वास करणार्या विविध पक्ष्यांचा नादमधुर गुंजारव, विविध वनस्पती, वृक्ष यांचे दर्शन, सारे काही विलोभनीय.. जणू वास्तवाशी फारकत घेऊन या नैसर्गिक नादब्रह्मात, ऐतिहासिक भूतकाळात विलिन होऊन जाण्याची स्थिती...
मग येताय ना शिवस्मृतीच्या, शिवनामाच्या पालखीचे भोई व्हायला ...