December 17, 2021 - BY Admin

आश्या प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या महाड युथ क्लब सारख्या सर्वच संस्थांचे तसेच गृपचे जेवढे काैतुक करावे तेवढे कमीच.. Nilesh Kute

सुमारे १७ ते १८ कि. मी. घनदाट जंगल, कधी चढण तर कधी उतरण, थोडासा कठीण परंतू उत्साहपूर्ण प्रवास करत महाड क्लब आयोजित शिवतिर्थ रायगडाची प्रदक्षिणा आज पूर्ण केली.
साधारणतः ५० ते ५५ वर्षापूर्वी गो. नी. दांडेकरांनी ही प्रदक्षिणा पहिल्यांदा पूर्ण केली. त्यावेळची परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीत नक्कीच मोठा बदल झालेला असावा यात शंका नाही. पण आजही हि प्रदक्षिणा पूर्ण करताना खरंच साठच्या दशकात गेल्याचा क्षणभर भास होतो. अगदी घनदाट जंगलातून झाडाची एक एक फांदी ओलांडतांना तासेच अवघड खिंडीतून स्वतः चा तोल संभाळतांना अगदी पायाखालचा एखादा दगड जरी सरकला तरी अंगावर शहारे आल्यावाचून राहत नाही. चढण चढताना अगदी छोट्याश्या झुडपाचा पण रोप व्हावा आणि अश्याच झुडपांचा आधार घेत सरळ उंच चढण चढत जावं असं सागळं काही. जमीनीकडून आभाळाकडे डोकावणार्या झाडांच्या फांद्या अगदी एखाद्या शोभेच्या वेलींपेक्षाही सुंदर दिसतात खर्या पण या वेलीसारख्या पसरलेल्या फांद्यांमधून वाट काढताना होणारी धडपडही अविस्मरणीयच..
साधारणपणे ७ ते ७.५ तासांच्या या प्रवासामध्ये ७ ते ८ वर्षाच्या बालकांपासून ते अगदी ६० ते ६२ वर्षांच्या माणसांपर्यंत सगळ्याच वयोगटातील प्रदक्षिणार्थी सहभागी होताना अनुभवले. सर्वांचा उत्साह होणाऱ्या त्रासापेक्षा कितीतरी पटीने जास्त आसतो हेही तेवढंच महत्वाचं.
तसा रायगड प्रदक्षिणा मार्गावरून(पायथ्याच्या सर्व बाजूंनी) खालून वर पाहण्याचीही चांगली संधी यानिमित्ताने मिळाली. तर प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतरचा तो आनंद, तो अभिमान जिंकल्याचा अनुभव देऊन गेला.
आश्या प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या महाड युथ क्लब सारख्या सर्वच संस्थांचे तसेच गृपचे जेवढे काैतुक करावे तेवढे कमीच..